अनैतिक संबंधांच्या संशयातून पतीने भर रस्त्यात केला पत्नीचा खून

वाशिम जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे… मालेगाव शहरात भर रस्त्यात पतीनेच आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण शहर हादरलं आहे… नेमकं काय आहे हे प्रकरण? पाहूया
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. भर दिवसा, लोकांच्या नजरेसमोर एका पतीने आपल्या पत्नीची निर्दयीपणे हत्या केली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत महिलेचे नाव पुष्पा विठ्ठल वाघ असे आहे. तर या प्रकरणातील आरोपी पती विठ्ठल वाघ याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. ही धक्कादायक घटना मालेगाव पोस्ट ऑफिस समोर घडली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, अनैतिक संबंधांच्या संशयातून पतीने हा टोकाचा निर्णय घेत पत्नीची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच मालेगाव शहर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी पाठवण्यात आला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
“पती-पत्नीच्या नात्यातील विश्वास तुटल्यावर अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे… मात्र कायदा हातात घेणं किती भयंकर ठरू शकतं, याचं हे जिवंत उदाहरण आहे… या प्रकरणात पुढे काय उलगडा होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…



