संजरपूर शिवारात महापारेषणच्या कामात अडथळा; शेतकरी दाम्पत्यावर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील संजरपूर शिवारात महापारेषणच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी शेतकरी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्चदाब विद्युत वाहिनीखालील झाडे तोडण्याच्या शासकीय कारवाईदरम्यान मारहाण आणि धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महापारेषणच्या ४०० केव्ही एकतूनी–बाभळेश्वर विद्युत वाहिनी प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या मनोऱ्यांखाली वाढलेल्या झाडांची तोड करण्याचे काम सुरू होते. याबाबत अतिरिक्त कार्यकारी अभियंता अश्विनी आशीष जोशी यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्या मागील तीन वर्षांपासून या प्रकल्पावर कार्यरत आहेत.
२१ एप्रिल २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास जोशी या आपल्या सहकाऱ्यांसह गट क्रमांक ७ मधील मनोरा क्रमांक १९६-१९७ दरम्यान झाडे तोडण्यासाठी गेल्या होत्या. विद्युत वाहिनीला धोका टाळण्यासाठी ही कारवाई करण्यात येत होती. यावेळी शेजारील जमीनधारक सखाराम दशरथ सुकासे आणि त्यांच्या पत्नीने या कामाला विरोध केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तसेच, सुकासे यांच्या पत्नीने तक्रारदारांचा हात पकडून थप्पड मारली, शिवीगाळ केली आणि “पुन्हा येथे आलात तर पाय तोडू” अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा इशारा देण्यात आला असून, या प्रकरणातील पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



