अमरावतीत भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर; २०० हून अधिक नागरिकांची तपासणी

अमरावती येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती (शहर) आणि सनशाईन मल्टिपरपज सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडले. हे शिबिर महानगरपालिका उर्दू स्कूल, जमील कॉलनी येथे आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराला परिसरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. डॉ. विकास महात्मे हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने २०० हून अधिक नागरिकांची नेत्र तपासणी केली. तपासणीदरम्यान अनेक रुग्णांमध्ये मोतीबिंदूची लक्षणे आढळून आली.
गरजू आणि पात्र रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून, त्यांना पुढील उपचार आणि शस्त्रक्रियेबाबत आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रकाशजी लड्डा, डॉ. बशीर पटेल, सुषमाताई मुळे आणि सरलाताई सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत समाजोपयोगी कार्यासाठी आयोजकांचे अभिनंदन केले.
या शिबिराचे आयोजन रियाज खान यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. सह-आयोजक म्हणून रादिल मुसानी आणि याहयाखा पठाण यांनी मोलाची भूमिका बजावली.
याशिवाय, या उपक्रमासाठी मो. अफसर, डॉ. झुबेर अहमद, संकेत चौधरी, दिलबर शाह, शरद पुसदकर, पांडुरंग बिजवे, अनिल वानखडे, वसीम भाई, दिगांबर चुनडे, गजानन इंगोले, रजिक अली शाह, राजाभाई पेंटर आणि डॉ. फिरोझ खान यांनी विशेष सहकार्य केले.
शिबिराच्या शेवटी आयोजकांच्या वतीने सर्व डॉक्टर, सहकार्य करणारे नागरिक आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले. समाजासाठी अशा प्रकारचे आरोग्यविषयक उपक्रम भविष्यातही राबवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.



