“महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव… सावित्री शक्तिपीठकडून ८ महिलांचा सन्मान”

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या सावित्री शक्ती पीठ, पुणे यांच्या वतीने बुरहानपूर जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा प्रेरणादायी सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. सावित्रीबाई फुले स्मृतिदिन आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आठ महिलांचा गौरव करण्यात आला.
शहापूर येथील संत सभागृहात मंगळवार, ८ मार्च रोजी शहापूर माळी समाज पंच मंडळाच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राजमाता जिजाऊ आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी प्रेरित या उपक्रमातून महिलांना आत्मनिर्भर आणि सक्षम बनवण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान स्त्री शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. तसेच समाजसेवा, शिक्षण आणि विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांच्या योगदानाची दखल घेत त्यांना “सावित्रीबाई फुले सन्मान पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
या सन्मानार्थींमध्ये बंभाडा गावातील शिक्षिका श्रीमती स्वाती प्रवीण चौधरी यांचाही समावेश असून, त्यांना सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्याला अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, तसेच शहापूर माळी समाज पंच मंडळाचे पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे आणि प्रेरणेचे वातावरण पाहायला मिळाले.
“महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान… समाजाला नवी दिशा देणारा हा उपक्रम ठरत आहे.”



