Amaravti GraminAmravaticitynewsCrime NewsLatest News

परतवाड्यात ‘व्हायरल व्हिडिओ’ प्रकरणाने खळबळ; तरुणावर लैंगिक शोषण व ब्लॅकमेलिंगचे आरोप, आरोपी फरार

अमरावती : जिल्ह्यातील परतवाडा शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकरण समोर आले असून, एका तरुणावर अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यासोबतच खाजगी व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याचीही चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद अय्याज मोहम्मद तनवीर असे आरोपीचे नाव असून, त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक तरुणींशी संपर्क साधत त्यांना फसवले, असा आरोप आहे. काही तरुणींसोबतचे खाजगी क्षण चित्रीत करून ते व्हिडिओ व्हायरल केल्याचा धक्कादायक दावा समोर येत आहे.

हे व्हिडिओ अचलपूर, परतवाडा आणि अमरावती परिसरात मोठ्या प्रमाणात पसरल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संबंधित व्हिडिओंमध्ये दिसणाऱ्या तरुणी या स्वेच्छेने नसून दबावाखाली असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, ब्लॅकमेलिंगचाही मुद्दा पुढे येत आहे.

घटनेनंतर आरोपी आपल्या कुटुंबासह फरार झाला असून, त्याच्या घराला कुलूप लागलेले आहे. विशेष म्हणजे, अद्याप कोणत्याही पीडितेकडून अधिकृत तक्रार दाखल झालेली नसल्याने पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.

दरम्यान, भाजप प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेऊन चौकशी सुरू करावी, अशी मागणी केली आहे. “तक्रार नाही म्हणून कारवाई नाही” असे धोरण न ठेवता, पीडितांना न्याय मिळावा यासाठी तत्काळ पावले उचलावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

या घटनेमुळे परिसरात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, आता सर्वांचे लक्ष पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लागले आहे.

प्रश्न कायम… आरोपीला अटक कधी होणार? आणि पीडितांना न्याय मिळणार का?

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button