समृद्धी महामार्गावर तिहेरी अपघात; ८ जखमी, २ गंभीर – मेहकरजवळ खळबळ

मेहकर (बुलढाणा) : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. १० एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मेहकर तालुक्यातील फर्दापूरजवळ चॅनेल क्रमांक २९३ येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात घडला. या अपघातात एकूण ८ जण जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-१७-बीव्ही-००६१ क्रमांकाच्या नेक्सा कारचा चालक शशांक कृष्णा खेरणार (वय २५, रा. साकूर, ता. संगमनेर) याने समोरील अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत तो गंभीर जखमी झाला.
दरम्यान, जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू असतानाच एमएच-१४-एच-२१३८ क्रमांकाच्या भरधाव कारने इनोव्हा गाडीला जोरदार धडक दिली. त्यानंतर दोन्ही वाहने पुढे जाऊन नेक्सा कारवर आदळली, ज्यामुळे अपघात अधिक भीषण झाला.
या अपघातात मदतकार्य करत असलेले महामार्ग पोलिस आकाश मोहाडे, संतोष सोनुने, सचिन आंधळे तसेच अग्निशमन दलाचे परमेश्वर शिंदे हे किरकोळ जखमी झाले. तसेच मदतीसाठी आलेले ट्रकचालक मोईनोद्दीन मोहम्मद शेख (रा. वसई) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
अपघातातील सर्व जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान, धडक देणाऱ्या औरा कारचा चालक अक्षय चनाप (रा. बार्शी टाकळी) हा अपघातानंतर फरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे. त्याच्या वाहनातील अमित बोंडे व तेजस वाघोरे हे किरकोळ जखमी झाले आहेत.
इनोव्हा चालक निजाम खान वकील खान यांना मात्र कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



