गुरु-शिष्य नात्याला काळीमा! मेहकर तालुक्यात शिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तनाचा गंभीर आरोप

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील लोणीगवळी येथे अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या तिसरीतील तीन अल्पवयीन विद्यार्थिनींशी संबंधित शिक्षकाने अश्लील वर्तन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षकाकडून मागील काही काळापासून या मुलींशी गैरवर्तन होत असल्याचा आरोप आहे. भीतीपोटी मुलींनी ही बाब दीर्घकाळ कुणालाही सांगितली नव्हती. मात्र, बुधवारी पुन्हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी धैर्य दाखवत आपल्या पालकांना सर्व माहिती दिली.
ही बाब समोर येताच संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी शाळेत धाव घेत आरोपी शिक्षकाला पकडून मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. काही काळ गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 74, 75, 78, 352 तसेच POCSO कायद्याअंतर्गत कलम 8 आणि 12 अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, सर्व पुरावे गोळा करून कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही घटना केवळ एक गुन्हा नसून समाजाला हादरवणारी आहे. शाळा ही मुलांसाठी सुरक्षित जागा असायला हवी, मात्र अशा प्रकारांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा व्हावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शाळांमध्ये कडक देखरेख आणि सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
📺 अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा — सिटी न्यूज



