बडनेरा पोलीस स्टेशन तर्फे हनुमान जयंती उत्सव, महाप्रसादाचे आयोजन

अमरावती शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या बडनेरा पोलीस स्टेशनच्या वतीने हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केवळ कायदा व सुव्यवस्थाच नव्हे, तर धार्मिक आणि सामाजिक कार्यातही पोलीस सक्रिय असल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. बडनेरा येथील पवनसुत हनुमान मंदिरात यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
बडनेरा परिसरातील पवनसुत हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त भक्ती आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. बडनेरा पोलीस स्टेशनच्या वतीने येथे भव्य पूजन, आरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शक्ती, भक्ती आणि सेवा यांचे प्रतीक असलेल्या हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुनील राणा, डीसीपी गणेश शिंदे, एसीपी कैलास फुंडकर, तसेच मनोज गजभिये, किशोर जाधव, अजय जैस्वाल, नगरसेविका गौरी मेघवानी आणि रजनी डोंगरे यांची उपस्थिती होती. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी केले. या धार्मिक उपक्रमामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ होण्यास मदत होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी पीआय गिते, पीएसआय हिवाळे, एएसआय प्रमोद गुंळदे यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. महाप्रसादाचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला असून, परिसरात सामाजिक एकोपा आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले होते.”
अशा प्रकारे, बडनेरा पोलिसांनी धार्मिक परंपरेचे जतन करत जनतेशी असलेले नाते अधिक घट्ट केले आहे. या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण पसरले होते.



