अमरावतीत हनुमान जयंतीचा जल्लोष! शहरभर भक्तीचा माहोल; मंदिरांत भाविकांची प्रचंड गर्दी

अमरावती | प्रतिनिधी
चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अमरावती शहरातही हा जन्मोत्सव भक्तिभाव, उत्साह आणि जल्लोषात पार पडला. पहाटेपासूनच शहरातील विविध हनुमान मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
हनुमान जयंतीनिमित्त शहरातील सर्व मंदिरांमध्ये महाभिषेक, विशेष पूजा, सुंदरकांड तसेच हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात आले होते. पौराणिक महत्त्व असलेल्या चांगापूर येथील हनुमान मंदिरात पहाटे महाभिषेक करण्यात आला आणि मोठ्या भक्तिभावात उत्सव साजरा झाला. येथे दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून हजारो भाविकांनी दर्शन घेत त्याचा लाभ घेतला.
महेंद्र कॉलनी स्थित श्री छत्रपती बालाजी जुगल किशोर संस्थान तसेच पांढरी हनुमान मंदिरातही हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले.
मसानगंज रोडवरील हनुमान मंदिरात सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. येथेही महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शिवम कॉलनी येथील हनुमान मंदिरातही दरवर्षीप्रमाणे यंदा मोठ्या भक्तिभावात उत्सव पार पडला.
संपूर्ण अमरावती शहर ‘जय श्रीराम’ आणि ‘जय हनुमान’च्या जयघोषाने दुमदुमून गेले होते. सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
अशा प्रकारे अमरावतीत हनुमान जयंती मोठ्या उत्साहात आणि श्रद्धाभावात साजरी करण्यात आली.



