अमरावतीत हनुमान जन्मोत्सवाचा जल्लोष; चांगापुरात महाआरती, रक्तदान शिबिरासह भक्तीचा उत्साह

अमरावती | प्रतिनिधी
हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने अमरावतीत सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून चांगापुर येथे उत्सवाचा भव्य सोहळा पार पडला. चांगापुर नरेशांच्या महाआरतीने या सोहळ्याला विशेष रंग चढला.
मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटेपासूनच चांगापुर परिसरात भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ‘जय श्रीराम’ आणि ‘जय हनुमान’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी सामूहिक हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले. तसेच, हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. भक्तीबरोबरच सेवाभावाचा संदेश देणारा हा उपक्रम ठरला.
दरम्यान, हजारो श्रद्धालूंनी महाप्रसादाचा लाभ घेतला. चांगापुरात दिवसभर भाविकांचा मोठा जनसैलाब पाहायला मिळाला.
भक्ती आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम घडवणारा हा हनुमान जन्मोत्सव चांगापुरात उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.



