citynewsDhamangaonLatest NewsMaharashtra

धामणगाव रेल्वेत विषारी साप चावल्याने ज्येष्ठाचा मृत्यू; परिसरात भीतीचे वातावरण

धामणगाव रेल्वे – शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. घरात झोपेत असताना विषारी साप चावल्याने ६५ वर्षीय ज्येष्ठ इसमाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना धामणगाव रेल्वे शहरातील रमाबाई आंबेडकर नगर, धावणेवाडी रोड परिसरात घडली. लक्ष्मण डोमाजी जोगे (वय ६५) हे आपल्या घरी झोपेत असताना विषारी सापाने त्यांना चावा घेतला. सुरुवातीला ही बाब लक्षात आली नाही, मात्र प्रकृती अचानक बिघडल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या मुलाचा रेल्वेखाली कटून मृत्यू झाला होता, त्यामुळे जोगे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

स्थानिक नागरिकांकडून या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, विषारी सापांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत असून, घराच्या आसपास स्वच्छता राखणे आणि आवश्यक ती सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button