उमरेडमध्ये भररस्त्यात मारुती ओमनीला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

उमरेड – शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भररस्त्यात चालत्या मारुती ओमनी गाडीला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ही घटना नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरातील भिशी नाका चौकात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मारुती ओमनी गाडी रस्त्यावरून जात असताना अचानक गाडीच्या इंजिनमधून धूर निघू लागला. काही क्षणातच धुराने भीषण आगीचे रूप घेतले.
आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ गाडी थांबवून स्वतःसह गाडीतून बाहेर पडला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत गाडी मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली होती.
या घटनेमुळे काही काळ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत पुढील तपास सुरू आहे.
सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर वाहनांमध्ये अचानक आग लागण्याच्या घटनांबाबत नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.



