AkolacitynewsLatest NewsMaharashtra

अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गैरवर्तनाचा आरोप; एएसआय निलंबित, चौकशी सुरू

अकोला – शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस ठाण्यातच महिला आरोपीसोबत गैरवर्तन झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक उपनिरीक्षकावर (एएसआय) महिला आरोपीकडून अश्लील मागणी केल्याचा आरोप असून, या प्रकरणामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ८० लाख रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका महिलेला लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. याच दरम्यान ड्युटीवर असलेल्या एएसआय राजेश जाधव यांनी संबंधित महिलेकडे अयोग्य व अश्लील मागणी केल्याचा आरोप आहे.

महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी अधिकाऱ्याने तिच्या मुलीला ‘शारीरिक सुखासाठी’ पाठवण्याची मागणी केली तसेच पैशांचे आमिषही दाखवले. या गंभीर आरोपांनंतर पोलीस विभागात एकच खळबळ उडाली.

तक्रार मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशी सुरू केली असून संबंधित एएसआयला निलंबित करण्यात आले आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओही समोर आला असून, त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी आरोपीला जाब विचारताना दिसत आहेत.

या प्रकरणात छेडछाडीसह इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे. अद्याप आरोपीला अटक झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे पोलीस ठाण्यातील महिला सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, जिथे महिलांना संरक्षण मिळायला हवे, तिथेच अशा प्रकारच्या घटना घडणे चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. आता आरोपी अधिकाऱ्यावर होणाऱ्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button