जेट इंधन दरात मोठी वाढ; सरकारकडून देशांतर्गत विमान कंपन्यांना दिलासा

नवी दिल्ली – मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत असताना जेट इंधनाच्या (ATF) किमतीत मोठी वाढ झाली आहे. मात्र, या वाढीचा पूर्ण भार देशांतर्गत विमान कंपन्यांवर पडू नये म्हणून केंद्र सरकारने हस्तक्षेप करत दिलासा दिला आहे.
बुधवारी सकाळी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOC) एप्रिल महिन्यासाठी दिल्लीतील ATF दर दुप्पट करत ₹2.07 लाख प्रति किलोलीटरपर्यंत वाढवले होते. मात्र काही तासांतच हा दर कमी करून ₹1.04 लाख प्रति किलोलीटर करण्यात आला.
सरकारने स्पष्ट केले की, १ एप्रिल २०२६ पासून देशांतर्गत बाजारात ATF दर १०० टक्क्यांहून अधिक वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे विमान भाड्यात अचानक मोठी वाढ होऊ नये म्हणून ही वाढ टप्प्याटप्प्याने आणि मर्यादित प्रमाणात लागू करण्यात आली आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या (OMCs) आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सल्लामसलतीनंतर हा निर्णय घेण्यात आला. यानुसार, देशांतर्गत विमान कंपन्यांवर सुमारे २५ टक्के म्हणजेच प्रति किलोलीटर अंदाजे ₹15,000 इतकी मर्यादित वाढ लागू करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे विमान भाड्यांमध्ये अचानक मोठी वाढ टाळता येणार असून प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.



