अमरावतीत सामूहिक अत्याचार प्रकरणामुळे संतापाची लाट; ५ आरोपी अटकेत, कठोर शिक्षेची मागणी

अमरावती – शहरातील भानखेडा जंगल परिसरात घडलेल्या सामूहिक अत्याचाराच्या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पाच आरोपींना अटक केली असली, तरी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
चार दिवसांपूर्वी एका तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेने अमरावतीसह संपूर्ण परिसर हादरला असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीने अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयावर धडक देत आंदोलन करण्यात आले. प्रहारच्या महिला पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.
यावेळी आरोपींची नावे जाहीर करण्यात यावीत, तसेच या प्रकरणाची जलदगतीने चौकशी करून पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणीही करण्यात आली.
या घटनेमुळे अमरावतीतील वातावरण तणावपूर्ण झाले असून, कायदा व सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आरोपींवर कोणती कठोर कारवाई होते आणि पीडितेला न्याय कधी मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



