मेळघाटात अवकाळी पावसाचा कहर; दीडशे क्विंटल मका भिजला, शेतकऱ्यांची नुकसानभरपाईची मागणी

मेळघाट परिसरात अवकाळी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. विशेषतः चिखलदरा तालुक्यात या पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून सुमारे दीडशे क्विंटल मका पूर्णपणे भिजल्याची माहिती समोर आली आहे.
चिखलदरा तालुक्यातील अनेक भागांत पावसासोबत गारपिटही झाल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली. गंगारखेड, कोटमी, कोरडा, हिरडा, जरीदा, चूरणी, मोहरियाम, कामीदा, भंडोरा आणि काटकुंभ या गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतात काढून ठेवलेला मका पावसामुळे पूर्णपणे भिजून खराब झाला आहे.
दरम्यान, आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रावर मका मोजमापासाठी तीन दिवसांपासून पडून होता. मात्र वेळेत मोजणी न झाल्यामुळे आणि कोणतीही संरक्षणात्मक उपाययोजना न केल्याने हा मका पावसात भिजून नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.



