गुमथळ्यात चार बकऱ्यांचा संशयास्पद मृत्यू; बिबट्याचा हल्ला की अन्य कारण?

बैलवाडा गावालगत असलेल्या गुमथळा परिसरात चार बकऱ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका घराजवळ तसेच गावाला लागून असलेल्या गोठ्यातील जवळपास दहा बकऱ्यांपैकी चार बकऱ्या मृत अवस्थेत आढळून आल्या. मात्र, या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून हा तपासाचा विषय ठरला आहे.
स्थानिकांच्या मते, हा हल्ला बिबट्याचा किंवा इतर एखाद्या जंगली प्राण्याचा असू शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच सरपंच शिबिराजजी ठाकरे, उपसरपंच दिपकजी काकडे, पोलीस पाटील सतीश ठाकरे, तसेच लुकेश भडंग आणि वनविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात येत असून, मृत्यूमागील कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
दरम्यान, संभाव्य वन्यप्राण्यांच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



