अवकाळी पावसाचा वाशिममध्ये कहर; गव्हाच्या पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी संकटात

वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले आहे. मानोरा तालुक्यातील वरोलीसह अनेक गावांमध्ये काढणीस आलेल्या गव्हाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे मानोरा तालुक्यातील वरोली आणि परिसरातील गावांना सर्वाधिक फटका बसला. सध्या गव्हाची काढणी सुरू असताना या पावसामुळे शेतात तयार असलेले गहू पूर्णपणे ओले झाले. अनेक ठिकाणी कापलेले गहू शेतातच पडून राहिल्याने त्याची गुणवत्ता खालावली आहे.
शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने उभे केलेले पीक काही तासांच्या पावसामुळे उद्ध्वस्त झाले असून, त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. कर्जबाजारी होण्याची भीतीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप ठोस हालचाल न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
अवकाळी पावसामुळे झालेल्या या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाले असून, शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.



