धक्कादायक! बापाच्या हातून मुलाची निर्घृण हत्या; सोलापूरच्या माढ्यात खळबळ

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रुई गावात रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ वादातून एका पित्याने आपल्या २५ वर्षीय मुलाची झोपेत असताना लोखंडी गजाने मारहाण करून निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
मृत तरुणाचे नाव विश्वजीत उर्फ पिलो राजेंद्र पतंगे (वय २५) असे असून आरोपी पित्याचे नाव राजेंद्र भानुदास पतंगे असे आहे. घटनेनंतर टेंभुर्णी पोलिसांनी आरोपीला तातडीने ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पतंगे कुटुंब हे अल्पभूधारक शेतकरी असून शुक्रवारी (दि. २७) दुपारी शेताला पाणी देण्याच्या कारणावरून वडील आणि मुलामध्ये फोनवरून तीव्र वाद झाला होता. या वादात मुलाने वडिलांना शिवीगाळ केल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वीही मुलाकडून मारहाण झाल्याचा राग मनात धरून पित्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
शुक्रवारी रात्री सुमारे ११ वाजता विश्वजीत घरात झोपलेला असताना राजेंद्र पतंगे यांनी म्हैस बांधण्यासाठी वापरला जाणारा लोखंडी गज घेतला आणि त्याच्या डोक्यावर व तोंडावर जबर मारहाण केली. हा हल्ला इतका क्रूर होता की विश्वजीतचा जागीच मृत्यू झाला.
ही भीषण घटना आई राजश्री पतंगे यांच्या डोळ्यादेखत घडली. मुलाचा मृत्यू पाहून हादरलेल्या आईने धैर्य दाखवत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरुद्ध खुनाची तक्रार दाखल केली.
या घटनेमुळे माढा तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.



