‘बाबा’ ऋषिकेश वैद्य अटकेत; अध्यात्माच्या नावाखाली महिलेवर अत्याचाराचा आरोप

पुणे/वसई (प्रतिनिधी):
वसई येथे स्वतःला धार्मिक गुरू म्हणून सादर करणाऱ्या ऋषिकेश वैद्य याला महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने फेसबुकच्या माध्यमातून संबंधित महिलेची ओळख करून घेतली होती. त्यानंतर अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्याने तिच्याशी जवळीक साधली. स्वतःला महादेवाचा अवतार असल्याचा दावा करत त्याने महिलेचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे.
पीडितेच्या तक्रारीनुसार, पुण्यातील एका लॉजमध्ये तिला अमली पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र पहिली घटना हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तपास तेथे वर्ग करण्यात आला.
आरोपीच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी चार पथके तयार केली होती. अखेर २७ मार्चच्या रात्री वसईतील माणिकपूर पोलिसांच्या मदतीने आरोपी ऋषिकेश वैद्य याला अटक करण्यात आली. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे तथाकथित भोंदू बाबांच्या वाढत्या प्रकारांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.



