अतिक्रमणधारकांना पट्टेवाटपाचा निर्णय; १५ लाख कुटुंबांना दिलासा, भोंदू बाबांवर कारवाईची मागणी

अमरावती (प्रतिनिधी):
राज्यातील राजकारणात मोठी घडामोड घडत असून, २०११ पूर्वीपासून सरकारी जागेवर राहणाऱ्या अतिक्रमणधारकांना पट्टेवाटप करण्याचा निर्णय प्रत्यक्षात येणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे १५ लाख कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अमरावतीत पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत दिलेला शब्द आता पूर्ण केला जात आहे. २०११ पूर्वीपासून सरकारी जागांवर वास्तव्यास असलेल्या नागरिकांना अधिकृत पट्टे देण्यात येणार आहेत.
दरम्यान, राज्यात वाढत असलेल्या भोंदू बाबांच्या प्रकारावरही त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. “महाराष्ट्रातील जनतेच्या भावना तीव्र आहेत. अशा भोंदूगिरीवर कठोर कारवाई व्हायला हवी,” असे त्यांनी स्पष्ट केले.
जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या चाकणकर प्रकरणावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, अनेक नेते विविध ठिकाणी भेट देतात आणि फोटो काढतात, मात्र संबंधित व्यक्तींबद्दल संपूर्ण माहिती असतेच असे नाही. “कधी भक्तीभावातून लोक फोटो काढतात, त्यामुळे फोटो काढणाऱ्यांवर दोष देणे योग्य नाही. मात्र लोकांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे,” असे त्यांनी नमूद केले.
नरहरी झिलवल प्रकरणाबाबत सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले. चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत चौकशी सुरू असून, अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबाबतही योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
या घोषणेमुळे अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा मिळणार असला तरी, भोंदू बाबांवर कारवाईची मागणी आणि इतर राजकीय मुद्द्यांमुळे राज्यातील राजकारणात हालचालींना वेग आला आहे.



