citynewsLatest NewsMaharashtraNanded

नांदेडमध्ये पत्रकाराच्या अपहरणाचा प्रयत्न; अवैध दारूविरोधात बातमी टाकल्याचा राग

नांदेड :
जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथे पत्रकाराच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवैध दारू विक्रीविरोधात बातमी प्रसिद्ध केल्याचा राग मनात धरून आरोपींनी हा प्रकार केल्याचा आरोप आहे.

माहितीनुसार, पत्रकार मनोज मन्नपूर्वे हे स्थानिक वर्तमानपत्र आणि यूट्यूब माध्यमातून कार्यरत आहेत. त्यांनी गावातील अवैध दारू विक्रीविरोधात २४ मार्च रोजी बातमी प्रसिद्ध केली होती. याच कारणावरून आरोपींनी त्यांच्या घरावर धाड टाकली.

घटनेच्या दिवशी रात्री चार दुचाकींवरून सुमारे आठ जण गावात आले. त्यांनी मनोज मन्नपूर्वे यांना घराबाहेर बोलावून शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर जबरदस्तीने दुचाकीवर बसवून अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दरम्यान, पत्रकाराने आरडाओरड केल्याने त्यांच्या पत्नी आणि ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. “बातमी का टाकली?” आणि “गावात ढवळाढवळ करू नकोस” अशा धमक्या देत आरोपींनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

हा संपूर्ण प्रकार एका ग्रामस्थाने मोबाईलमध्ये चित्रित केला असून ग्रामस्थांच्या तत्काळ हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच अर्धापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे.

या प्रकरणी पत्रकार संरक्षण कायदा, अपहरणाचा प्रयत्न आणि इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एकूणच, पत्रकारावर झालेला हा हल्ला केवळ धक्कादायक नसून लोकशाहीसाठीही गंभीर इशारा मानला जात आहे. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button