धारणीमध्ये पेट्रोलसाठी मोठी धावपळ; अफवेमुळे पंपांवर तुफान गर्दी

अमरावती जिल्ह्यातील धारणी शहरात “पेट्रोल बंद होणार” या अफवेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील काही पेट्रोल पंपांवर साठा उपलब्ध नसल्याने नागरिकांची संपूर्ण गर्दी एच.पी. आणि नायरा (Nayara) पेट्रोल पंपांवर वळली आहे. परिणामी सकाळपासून रात्रीपर्यंत वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
शासनाकडून पेट्रोलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे वारंवार सांगितले जात असतानाही नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीती कायम आहे. “पेट्रोल मिळणार नाही” या भीतीने अनेकांनी घाईघाईने इंधन भरण्यासाठी पंपांकडे धाव घेतली.
या परिस्थितीमुळे शहरात काही ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून गोंधळाचे वातावरणही पाहायला मिळत आहे.
एकूणच धारणीमध्ये प्रत्यक्ष इंधनटंचाईपेक्षा अफवांचा प्रभाव अधिक दिसून येत असून, प्रशासन ही परिस्थिती कशी नियंत्रणात आणते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



