वडगाव माहोरे-भवानी परिसरात धुळीच्या त्रासाविरोधात नागरिकांचा रस्ता रोको; प्रशासनाविरोधात संताप

वडगाव माहोरे आणि भवानी परिसर येथील नागरिकांचा संयम अखेर संपला असून, क्रेशर आणि आर.एम.सी. प्लांटमुळे निर्माण होणाऱ्या धुळीच्या त्रासाविरोधात नागरिकांनी आज थेट रस्त्यावर उतरून आंदोलन केलं.
गेल्या अनेक महिन्यांपासून या परिसरात धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. परिसरातील क्रेशर आणि आर.एम.सी. प्लांटमुळे वातावरण धुळमय झालं असून, याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
१८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या जनसंवाद मेळाव्यात नागरिकांनी या समस्येबाबत पालकमंत्र्यांकडे तक्रार करत निवेदन सादर केलं होतं. मात्र, त्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली.
धुळीमुळे लहान मुलं, वृद्ध आणि सर्वसामान्य नागरिकांना श्वसनाचे त्रास होत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शाळकरी मुलांनाही शाळेत जाणं कठीण झाल्याचं पालकांनी सांगितलं.
या पार्श्वभूमीवर २५ मार्च २०२६ रोजी भवानी मंदिराजवळ नागरिकांनी रस्त्यावर बसून जोरदार आंदोलन केलं. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला आणि गावकऱ्यांनी सहभाग घेत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
नागरिकांनी लवकरात लवकर या धुळीच्या समस्येवर ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे… अन्यथा हे आंदोलन आणखी उग्र रूप धारण करू शकतं…



