अमरावतीतील शोभा नगरमध्ये गुढीपाडवा-चैत्र नवरात्र उत्सव उत्साहात; ११११ भाविकांचे सामूहिक महापरायण

अमरावती शहरातील शोभा नगर येथील मा. दुर्गा देवी मंदिरात गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उत्सवात तब्बल ११११ भाविकांनी एकत्र येत श्री सप्तशती विजय ग्रंथाचे महापरायण पठण करत भक्तीचा अनोखा सोहळा अनुभवला.
मंदिर संस्थेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात बुधवार, २५ मार्च २०२६ रोजी सामूहिक महापरायण सोहळा पार पडला. या वेळी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता. मोठ्या संख्येने भाविकांनी श्रद्धेने सहभाग घेत पारायण केले.
उपस्थित भाविकांसाठी मंदिर संस्थेकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा लाभ हजारो भक्तांनी घेतला. या उत्सवादरम्यान श्याम भजन संध्या, सुंदरकांड, आरती, हवन, भजन तसेच राम जन्म सोहळा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच दररोज महिला भजन मंडळांकडून भजन, हरिपाठ आणि आरती सादर करण्यात येत होती. या सर्व कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, संपूर्ण परिसरात भक्ती आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले.
मा. दुर्गा देवी मंदिरात पार पडलेल्या या भव्य धार्मिक सोहळ्याने अमरावती शहरात भक्ती, एकता आणि श्रद्धेचा सुंदर संदेश दिला आहे…



