अमरावतीत बिबट्यांचा वाढता वावर; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, विधानसभेत मुद्दा उपस्थित

अमरावती शहरात बिबट्यांच्या वाढत्या संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वडाळी, मंगलधाम, एसआरपीएफ कॅम्पसह अनेक भागांमध्ये बिबट्याच्या हालचाली दिसून येत आहेत.
शहरालगत असलेल्या वडाळी आणि पोहरा जंगल परिसरातून बिबट्यांचा वावर वाढला असून, हे वन्यप्राणी अन्न आणि पाण्याच्या शोधात थेट शहरात प्रवेश करत असल्याचे समोर आले आहे. वडाळी, विद्यापीठ परिसर, तपोवन, मंगलधाम, एसआरपीएफ कॅम्प आणि जुना बायपास या भागांमध्ये बिबट्याच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.
या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, काही भागात संध्याकाळनंतर घराबाहेर पडण्यासही नागरिक घाबरत आहेत. मंगलधाम परिसरात तर सायंकाळी ६ नंतर रस्ते ओस पडत असून, ऑटो-रिक्षाही उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार सुलभाताई संजय खोडके यांनी विधानसभेत हा गंभीर मुद्दा उपस्थित करत शासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यांनी वनक्षेत्रात चॅनेलिंग फेन्सिंग करण्याची सूचना देखील केली, जेणेकरून बिबट्यांचा शहराकडे होणारा प्रवेश रोखता येईल.
यावर उत्तर देताना राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की, वन्यजीव संरक्षणासोबतच मानवी जीविताचे रक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे. अमरावतीत बिबट्यांचा शिरकाव रोखण्यासाठी वनविभागाला तातडीने ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच जिल्हा प्रशासन, पोलीस आणि स्थानिक यंत्रणांच्या समन्वयाने प्रभावी कारवाई केली जाणार असून, सीसीटीव्ही देखरेख, तांत्रिक उपाय आणि इतर माध्यमांतून बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
अमरावतीत बिबट्यांची वाढती दहशत लक्षात घेता प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलली जातात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



