दिल्लीत भीषण बस अपघात; २ ठार, अनेक जखमी

दिल्लीत पहाटेच्या सुमारास एक भीषण रस्ते अपघात घडला असून, या दुर्घटनेत २ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात करोल बाग परिसरातील झंडेवाला मंदिर जवळ घडला. जयपूरहून दिल्लीकडे येणारी स्लीपर बस मंगळवारी मध्यरात्री सुमारे १ वाजता ३० प्रवाशांना घेऊन जात होती. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली आणि मोठा अपघात झाला.
अपघात इतका भीषण होता की बसचा अक्षरशः चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या दुर्घटनेत २ जणांचा जागीच मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, जखमींवर उपचार सुरू आहेत. पोलीस या अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास करत आहेत.



