नागपूरमध्ये घरफोडी; दागिने आणि रोख रक्कमेसह लाखोंचा ऐवज लंपास

नागपूर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असल्याचं चित्र समोर येत असून, झिंगाबाई टाकळी परिसरात घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष सुरेश सिंह हे आर्य नगर भागात आपल्या कुटुंबासह राहतात. ते रेल्वे पोलिस विभागात कार्यरत आहेत. कौटुंबिक कार्यक्रमासाठी त्यांची पत्नी आणि मुले बाहेरगावी गेल्यानंतर काही दिवसांनी संतोष सिंह घरी परतले असता घरफोडी झाल्याचं समोर आलं.
घराचा दरवाजा उघडताच घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेलं दिसलं आणि आलमारीचे कुलूप तोडलेले होते. तपासणी केली असता घरातून सोन्याचे दागिने, मंगळसूत्र, चांदीचे दागिने आणि तब्बल १ लाख ४३ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याचे उघड झाले.
अज्ञात चोरट्यांनी सुमारे २ लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. नागपूरमधील या घटनेमुळे शहरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पोलिस या प्रकरणाचा छडा किती लवकर लावतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



