Accident NewsInternational NewsLatest News

✈️ न्यूयॉर्कमध्ये भीषण विमान अपघात : रनवेवरच धडक, २ ठार तर ७० हून अधिक जखमी

अमेरिकेत मोठी दुर्घटना घडली असून न्यूयॉर्क येथील ला गार्डिया विमानतळावर प्रवाशांनी भरलेल्या विमानाला अग्निशमन दलाच्या वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात २ जणांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एअर कॅनडाचे सीआरजे-९०० हे विमान टॅक्सीवेवरून रनवे ४ कडे जात असताना ही घटना घडली. विमानात १०० पेक्षा अधिक प्रवासी होते. अपघात इतका भीषण होता की विमानाच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आणि काही भाग तुटून पडले.

अपघातापूर्वी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने विमान आणि रनवेवरील अग्निशमन दलाच्या वाहनाला थांबण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, सूचनांकडे दुर्लक्ष करून वाहन पुढे गेले आणि थेट विमानावर आदळले. या निष्काळजीपणामुळेच मोठी जीवितहानी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

घटनेनंतर तात्काळ अग्निशमन दल आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

या अपघातानंतर ला गार्डिया विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले असून सर्व उड्डाणे जेएफके एअरपोर्ट येथे वळवण्यात आली आहेत. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन ने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.

दरम्यान, या अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर आला असून संपूर्ण घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिकाऱ्यांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button