बुलढाण्यात जलसमाधी आंदोलन; पेनटाकळी धरणात तिघांचा टोकाचा निर्णय, प्रशासनावर दबाव

बुलढाणा जिल्हा मधून एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. मेहकर तालुका येथील पेनटाकळी धरण येथे तिघांनी थेट जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे.
मेहकर तालुक्यातील सारशिव गावातील मनिष जाधव, प्रविण राजगुरू आणि पंकज वाघ यांनी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन छेडले आहे. गावातील गट नंबर १९ मधील सुमारे ६० आर जमीन हिंदू स्मशानभूमीसाठी खुली करून देण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे.
यासोबतच स्मशानभूमीवर लावण्यात आलेली झटका मशीन हटवावी आणि जिल्हा परिषद शाळेच्या परिसरातील अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. या मागण्यांसाठी यापूर्वी अनेक वेळा आंदोलन व निवेदने देण्यात आली होती. मात्र प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
यामुळे अखेर आंदोलनकर्त्यांनी जलसमाधी आंदोलनाचा टोकाचा मार्ग स्वीकारत थेट धरणात उतरून आंदोलन सुरू केले. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या या गंभीर परिस्थितीकडे संपूर्ण मेहकर तालुक्याचे लक्ष लागले असून, प्रशासन आता काय निर्णय घेते आणि परिस्थिती कशी हाताळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



