Uncategorized

‘महाक्राईमओएस’ चा राज्यभर होणार वापर; २ कोटी रुपयांचा निधी मंजूर

नागपूर अत्यंत गुंतागुंतीच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी आता तंत्रज्ञानाची नवी साथ मिळत आहे. नागपूर ग्रामीण पोलिस दलाने राज्यातील पहिला ‘एआय’ आधारित प्रायोगिक प्रकल्प सुरू केला आहे.

‘महाक्राईमओएस’ या अत्याधुनिक एआय प्लॅटफॉर्मच्या मदतीने गुन्हे तपासाची प्रक्रिया अधिक वेगवान, अचूक आणि शिस्तबद्ध होत आहे. या प्रकल्पासाठी राज्याच्या गृह विभागाने सुमारे २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

या प्लॅटफॉर्मची सुरुवात काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. मायक्रोसॉफ्टच्या ‘क्राईमओएस’ या प्रणालीवर आधारित असलेला हा प्लॅटफॉर्म, ‘मार्व्हल’ संस्थेने महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषेसाठी विशेष विकसित केला आहे.

अमली पदार्थ, आर्थिक फसवणूक, सायबर क्राईम आणि लैंगिक गुन्ह्यांसारख्या जटिल प्रकरणांमध्ये तपास अधिकाऱ्यांना आता एआयचे मार्गदर्शन मिळत आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर हा प्लॅटफॉर्म तपासाची दिशा टप्प्याटप्प्याने दाखवतो.

विशेष म्हणजे, तपासातील आवश्यक पत्रव्यवहारही ‘कोपायलट’च्या मदतीने तयार होतो, ज्यामुळे वेळ वाचतो आणि अचूकता वाढते.

या प्रकल्पासाठी १३३ पोलिस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, आतापर्यंत २८७ प्रकरणांचा तपास या प्रणालीद्वारे करण्यात आला आहे.

या एआय प्लॅटफॉर्मच्या मदतीने नागपूर ग्रामीण पोलिसांनी काही महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये यशही मिळवले आहे — कोलकात्यातून आरोपीला अटक, तसेच फसवणुकीतील लाखो रुपये परत मिळवणे यांसारखी उदाहरणे यशाची साक्ष देतात.

पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मते, “हा एआय प्लॅटफॉर्म तपास प्रक्रियेसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असून, भविष्यात गुन्हे तपासामध्ये मोठ्या प्रमाणात ऑटोमेशन होण्याची शक्यता आहे.”

नागपूर ग्रामीणचा हा उपक्रम आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक नवा मार्गदर्शक ठरू शकतो.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button