तिवसा बसस्थानकासमोर भीषण अपघात

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे बसस्थानकासमोर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. नागपूरवरून अकोल्याकडे जाणाऱ्या एसटी बस आणि अमरावतीवरून नागपूरकडे जाणाऱ्या कारची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कारचे नुकसान झाले आहे.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील बसस्थानक परिसरात पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली. नागपूरवरून अकोल्याकडे जाणारी एसटी बस क्रमांक एमएच १४ एमटी ०८८१ आणि अमरावतीवरून नागपूरकडे जाणारी कार क्रमांक एमएच २७ ईसी १८६१ यांची समोरासमोर धडक झाली. धडकेचा आवाज मोठा असल्यामुळे परिसरातील नागरिक आणि प्रवासी तात्काळ घटनास्थळी धावून आले. अपघातामुळे काही वेळासाठी परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारचे पुढील भागाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर बसस्थानक परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, बसस्थानक परिसरात बस, ट्रक, चारचाकी आणि दुचाकींची मोठी रहदारी असते. तसेच जवळच शाळा आणि महाविद्यालये असल्यामुळे विद्यार्थ्यांचीही मोठी वर्दळ असते. यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. अपघात टाळण्यासाठी येथे स्पीड ब्रेकर, वेगमर्यादा फलक आणि पोलिस बंदोबस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तिवसा बसस्थानक परिसरात वारंवार होणारे अपघात लक्षात घेता प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.



