अमरावतीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग; महावितरणचा तयार डीपी स्ट्रक्चर जळून खाक! पाच दिवस कचरा साचूनही मनपाचे दुर्लक्ष?

जवाहर गेट प्रभागातील साबणपुरा परिसरात मध्यरात्री दोनदा लागली आग; पहाटे तीनच्या सुमारास डीपी स्ट्रक्चर आणि जोडलेल्या वायर्स जळाल्या; वीजपुरवठा सुरू नसल्याने मोठा अनर्थ टळला, मनपाच्या स्वच्छता विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
अमरावती : शहरातील कचऱ्याच्या समस्येने आता गंभीर आणि धोकादायक वळण घेतले आहे. जवाहर गेट प्रभागातील साबणपुरा परिसरात गेल्या पाच दिवसांपासून साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागून महावितरणचा तयार डीपी स्ट्रक्चर जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, एकाच रात्री दोन वेळा कचऱ्याला आग लागली. पहाटेच्या सुमारास लागलेल्या दुसऱ्या आगीत डीपी स्ट्रक्चर आणि त्याला जोडलेल्या वायर्सचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या डीपीचा वीजपुरवठा अद्याप सुरू झाला नव्हता. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. या घटनेमुळे महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

जवाहर गेट प्रभागातील साबणपुरा परिसरात गेल्या पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचरा साचून होता. परिसरातील कचरा नियमित उचलला जात नसल्याने कचऱ्याचे ढीग तयार झाले होते. कचरा संकलन करणारी यंत्रणा प्रभागातील काही ठरावीक ठिकाणांवरूनच कचरा उचलत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. परिणामी, इतर ठिकाणी कचऱ्याचे ढीग वाढत असून नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, रात्री सुमारे अकरा वाजताच्या सुमारास या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागली. आग पसरू नये म्हणून परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेत पाणी टाकून आग विझवली. मात्र, काही तासांतच पुन्हा एकदा आगीची घटना घडली. पहाटे सुमारे तीन वाजताच्या सुमारास त्याच कचऱ्याच्या ढिगाऱ्याला पुन्हा आग लागली. यावेळी आगीच्या ज्वाळा जवळच उभारण्यात आलेल्या महावितरणच्या तयार डीपी स्ट्रक्चरपर्यंत पोहोचल्या.
या आगीत डीपी स्ट्रक्चर जळून खाक झाले, तर त्याला जोडलेल्या वायर्सचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेष बाब म्हणजे, या डीपीचा वीजपुरवठा अद्याप सुरू करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे संभाव्य विद्युत दुर्घटना टळली. मात्र, वीजपुरवठा सुरू असताना अशी घटना घडली असती, तर परिसरातील नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होऊ शकला असता.
कचरा साचला पाच दिवस; कारवाई मात्र आग लागल्यानंतरच?
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कार्यक्षमतेवर नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या पाच दिवसांपासून कचरा साचलेला असताना संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्याची दखल का घेतली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, कचऱ्याला आग लागल्यानंतरच घटनास्थळी राजकीय पुढाऱ्यांची गर्दी सुरू झाल्याची टीकाही नागरिकांकडून केली जात आहे.
महापालिका प्रशासनाकडून शहर स्वच्छतेचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात अनेक भागांत कचऱ्याचे ढीग कायम असल्याचे चित्र आहे. स्वच्छता विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कथित निष्क्रियतेमुळे नागरिकांना वारंवार अशा समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप होत आहे. नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून तक्रारी करूनही प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची नाराजीही व्यक्त केली जात आहे.
कचऱ्याचा प्रश्न आता नागरिकांच्या सुरक्षेवर!
साबणपुरा येथील घटना केवळ अस्वच्छतेचा प्रश्न नसून, कचऱ्याचे ढीग आता सार्वजनिक मालमत्तेसह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीही धोकादायक ठरत असल्याचे अधोरेखित करणारी आहे. सुदैवाने महावितरणचा डीपी सुरू होण्यापूर्वीच आगीत जळाल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेनंतर तरी महापालिकेचा स्वच्छता विभाग जागा होणार का, शहरातील कचऱ्याचे ढीग हटविण्यासाठी ठोस उपाययोजना होणार का आणि या निष्काळजीपणाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
स्वच्छ अमरावतीचे दावे एका बाजूला आणि प्रत्यक्षात कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे निर्माण होणारे धोके दुसऱ्या बाजूला! साबणपुरातील घटनेने महापालिका प्रशासनाच्या स्वच्छता व्यवस्थेचा आरसाच समोर आणला आहे.



