citynewsIndia NewsLatest News

भटक्या बैलाचा भीषण हल्ला; ६४ वर्षीय महिलेची मृत्यूशी झुंज सुरू, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

प्रतिनिधी :
२७ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडलेल्या एका थरारक घटनेत ६४ वर्षीय वंदना देवीकर यांच्यावर घरासमोरच भटक्या बैलाने भीषण हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी वंदना देवीकर या नेहमीप्रमाणे घरासमोर झाडू मारत होत्या. त्याचवेळी अचानक एक भटका बैल वेगाने धावत आला आणि थेट त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांच्या फासळ्या व इतर अनेक हाडे मोडली. बैलाच्या शिंगाने त्यांच्या मांडीला गंभीर जखम झाली. तसेच डोक्याला जबर दुखापत होऊन मेंदूला मोठा धक्का बसला.

घटनेनंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल तीन आठवडे त्या आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत होत्या. प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने डॉक्टरांना मेंदूची जटिल शस्त्रक्रिया करावी लागली. या शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्या कवटीचा एक भाग काढून टाकावा लागल्याची माहिती समोर आली आहे.

शस्त्रक्रियेनंतरही त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. गेल्या महिन्याभरापासून त्या कोमात असून सध्या घरी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सपोर्टवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत उपचारांवर लाखो रुपयांचा खर्च झाला असून कुटुंबावर मोठे आर्थिक व मानसिक संकट ओढवले आहे.

दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरातील वाढत्या भटक्या जनावरांच्या समस्येबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासन आणि महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

“एका निष्पाप महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त… जबाबदार कोण? प्रशासन कधी जागे होणार?” असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button