AmravatiCrime NewsLatest News

अमरावती : बडनेऱ्यात बोगस ‘मुळव्याध तज्ज्ञवर कारवाई; मनपा आरोग्य विभाग व पोलिसांची संयुक्त धाड

अमरावती शहरात बोगस डॉक्टरांविरोधात मनपाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली आहे. बडनेरा परिसरात तब्बल १२ ते १५ वर्षांपासून स्वतःला मुळव्याध तज्ज्ञ सांगून उपचार करणाऱ्या एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय शैक्षणिक कागदपत्रांशिवाय अ‍ॅलोपॅथीसह विविध पद्धतींची औषधे देत ऑपरेशन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

तक्रारींनंतर स्टिंग ऑपरेशन

अमरावती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच महाराष्ट्र वैद्यकीय परिषद यांच्याकडून बोगस डॉक्टरांविषयी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार नगिना मशिदजवळील आठवडी बाजार परिसरात सुरू असलेल्या दवाखान्यावर स्टिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

मुख्यालयातील डॉ. रुपेश खडसे, शहरी आरोग्य केंद्र बडनेराचे वैद्यकीय अधिकारी डॉ. इमरान शाह आणि त्यांच्या पथकाने बनावट रुग्ण पाठवून सापळा रचला. संबंधित व्यक्तीने रुग्णाची तपासणी करून फी स्वीकारली, अ‍ॅलोपॅथीची औषधे लिहून दिली तसेच मुळव्याध ऑपरेशनसाठी १० ते १५ हजार रुपये खर्च येईल, असे सांगितले.

वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे उघड

यानंतर पथकाने दवाखान्यात जाऊन वैद्यकीय शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी केली असता कोणतेही अधिकृत प्रमाणपत्र आढळले नाही. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने २४ तासांची मुदत देण्यात आली.

मनपा आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांच्या आदेशानंतर पोलिसांच्या मदतीने दवाखान्यावर धाड टाकण्यात आली. कारवाईदरम्यान अ‍ॅलोपॅथिक, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक व इलेक्ट्रो होमिओपॅथिक औषधे, ऑपरेशनचे साहित्य, प्रोटॉस्कोपी उपकरणे तसेच “मुळव्याध भंगदर स्पेशालिस्ट” असा फलक जप्त करण्यात आला.

या प्रकरणी वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ अंतर्गत विविध कलमान्वये बडनेरा पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनपा प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की अमरावती शहरात बोगस डॉक्टरांना थारा दिला जाणार नाही. नागरिकांनी आपल्या परिसरात अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्यास तात्काळ तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button