गडहिंग्लजमध्ये शिर नसलेला महिलेचा मृतदेह आढळला; खून की अपघात? पोलिसांकडून तपास वेगात

गडहिंग्लज – कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात नेसरी–महागाव मार्गावरील ओढ्यालगत एका महिलेचा शिर नसलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी (११ फेब्रुवारी) उघडकीस आली असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मृत महिला सुनीता संजय केसरकर (वय ४०, रा. भडगाव, ता. गडहिंग्लज) असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, पोलिसांकडून याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
तीन आठवड्यांपासून बेपत्ता
सुनीता केसरकर या १८ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास “बाजाराला जाते” असे सांगून घरातून बाहेर पडल्या होत्या. त्या रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या पतीने गडहिंग्लज पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. सुनीता या मजुरीचे काम करत होत्या, तर त्यांचे पती ऊसतोडणीचे काम करतात.
ओढ्यात सापडला मृतदेह
महागाव–मासेवाडी दरम्यान ‘घंटीचा झरा’ नावाच्या ओढ्याच्या पात्रात ग्रामस्थांना अज्ञात महिलेचा शिर नसलेला मृतदेह दिसून आला. मृतदेहाची अवस्था अत्यंत भीषण होती. उजव्या पायाची हाडे उघडी पडलेली होती. मृतदेहाजवळ सापडलेली चप्पल, अंगावरील साडी, बांगड्या आणि हातातील काळा दोरा यावरून नातेवाइकांनी तो मृतदेह सुनीता केसरकर यांचाच असल्याची ओळख पटवली असल्याची माहिती समोर आली आहे.
मोबाइलवर संपर्क झाला नाही
सुनीता यांच्याकडे मोबाइल फोन असल्याची माहिती आहे. त्या बेपत्ता झाल्यानंतर नातेवाइकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे सांगण्यात आले.
खून की अपघात?
मृतदेहावर शिर नसल्यामुळे हा अपघाती मृत्यू आहे की घातपात, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. सध्या पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असली तरी खूनाचा संशय गृहित धरून तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणामुळे गडहिंग्लज तालुक्यात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसमोर या गुंतागुंतीच्या घटनेचा छडा लावण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.



