AmravatiEducation NewsLatest News

विद्यापीठातील वुमेन्स स्टडीज सेंटरद्वारा वक्तृत्व स्पर्धा संपन्न

अमरावती (दि. 10.02.2026)- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील वुमेन्स स्टडीज सेंटरद्वारा ‘जेंडर इक्वलिटी : सद्यस्थिती आणि आव्हाने’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. विद्यापीठातील शैक्षणिक विभागांमधील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये लैंगिक समानता विषयक जाणीव जागृती व्हावी, तसेच त्यांच्यात लिंगभाव संवेदनशीलतेचा विकास व्हावा, या हेतूने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रत्येक स्पर्धकाने विषयाच्या अनुषंगाने संदर्भ देत मांडणी केली. त्यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आणि दोन प्रोत्साहनपर क्रमांक निवडण्यात आले.

               या स्पर्धेत एम.ए. जेंडर अँड वुमेन्स स्टडीज अभ्यासक्रमाचे विद्यार्थी प्रफुल्ल कुकडे यांनी यांनी प्रथम,  तर ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागातील विद्यार्थी नितीन गवई यांनी द्वितीय, शिक्षणशास्त्र विभागातील विद्यार्थी प्रज्वल घोम यांनी तृतीय तर एम.ए. जेंडर अँड वुमेन्स स्टडीज अभ्यासक्रमाची प्राजक्ता देशमुख आणि पल्लवी चिमूरकर यांनी प्रोत्साहनपर क्रमांक पटकाविला. या स्पर्धेचे परीक्षण महात्मा ज्योतिबा फुले वाणिज्य व विज्ञान आणि विठ्ठलराव राऊत कला महाविद्यालय, भातकुली येथील मराठी विभागप्रमुख डॉ. रवी साखरकर यांनी केले.  क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना स्पर्धेचे परीक्षक डॉ. रवी साखरकर यांसह सेंटरचे प्रा. डॉ. भगवान फाळके उपस्थित होते.

                बक्षीस वितरणावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना परीक्षक डॉ. रवी साखरकर म्हणाले, समाजाचा संतुलित विकास होण्यासाठी लैंगिक समानता आवश्यक आहे. त्यासाठी समाजात लिंगभाव संवेदनशीलता विकसित करण्यासाठी जाणीव-जागृती करणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. पूजा अलोने यांनी केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button