पिंपरी चिंचवडच्या राजकारणात हायव्होल्टेज ड्रामा! उपमहापौरपदासाठी नाव जाहीर होताच उमेदवाराचा ‘एक्झिट’ प्लॅन; भाजपमध्ये मोठी खळबळ

पिंपरी चिंचवड: राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आज निवडीच्या प्रक्रियेदरम्यान एक अभूतपूर्व धक्कादायक प्रकार घडला. भाजपच्या वतीने उपमहापौर पदासाठी नाव जाहीर होताच, संबंधित उमेदवाराने थेट महापालिका भवन सोडल्याने सत्ताधारी भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्यामुळे शहरात जोरदार राजकीय रस्सीखेच सुरू होती. भाजपने सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवल्यानंतर महापौरपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर, सलग दोन वेळा बिनविरोध निवडून येण्याचा विक्रम करणारे रवी लांडगे यांच्या नावावर महापौरपदासाठी शिक्कामोर्तब झाले.
मात्र, खरा ट्विस्ट आला तो उपमहापौर पदाच्या निवडीवेळी. भाजपने उपमहापौर पदासाठी पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते विजय उर्फ शीतल शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. परंतु, स्वतःचे नाव उपमहापौर पदासाठी ऐकताच शीतल शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता महापालिका भवन सोडून जाणे पसंत केले.
नाराजीचे कारण काय?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल शिंदे हे महापौर पदासाठी प्रबळ इच्छुक होते. मात्र पक्षाने त्यांना उपमहापौर पद देण्याचा निर्णय घेतल्याने ते नाराज झाले असल्याची चर्चा आहे. पद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिल्याचे बोलले जात असून, त्यांच्या या पावलामुळे भाजपसमोर आता मोठा पेच निर्माण झाला आहे.
‘गावकी’ आणि लांडगे समर्थकांचे राजकारण
भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि रवी लांडगे यांच्यात पूर्वी राजकीय संघर्ष होता. मात्र, आगामी निवडणुका आणि गावकीतील एकी टिकवण्यासाठी महेश लांडगे यांनी पुढाकार घेत रवी लांडगे यांना महापौर पद देण्याचा शब्द दिला होता. तो शब्द पाळत भाजपने रवी लांडगे यांना संधी दिली, पण याच वेळी शीतल शिंदे यांच्या नाराजीने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची माघार
राज्याच्या राजकारणातील मोठे नाव आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या आकस्मिक निधनानंतर, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने महापौरपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रवी लांडगे यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मात्र, उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीच्या वैशाली काळभोर यांनी अर्ज दाखल केला आहे. जर भाजपने शीतल शिंदे यांच्या नाराजीवर वेळीच तोडगा काढला नाही किंवा नवीन उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, तर विरोधी पक्षाचा उपमहापौर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
महत्त्वाची अपडेट: भाजप आता शीतल शिंदे यांची मनधरणी करणार की नवीन नावाचा विचार करणार? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.



