जळकापट येथील बैलगाडा शंकरपट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

तिसऱ्या दिवशी तुफान गर्दी; खासदार अमर काळेंची उपस्थिती, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्पष्ट भूमिकाजळकापट, तालुका धामणगाव रेल्वे येथे सुरू असलेल्या भव्य बैलगाडा शंकरपट स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. तालुक्यासह परिसरातील अनेक गावांमधून नागरिक मोठ्या उत्साहात शंकरपट पाहण्यासाठी जळकापटमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रातील विविध भागांतून पटशौकिन आपल्या आकर्षक पद्धतीने सजवलेल्या बैलजोड्या घेऊन या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. शिस्तबद्ध नियोजन, उत्कृष्ट व्यवस्थापन आणि सुरक्षिततेच्या योग्य उपाययोजनांमुळे या शंकरपट स्पर्धेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या स्पर्धेला खासदार अमर काळे यांनी भेट देत आयोजकांचे विशेष कौतुक केले. शंकरपट हा शेतकऱ्यांच्या जीवनाशी आणि ग्रामीण संस्कृतीशी घट्ट जोडलेला पारंपरिक खेळ असून, अशा खेळांचे जतन आणि संवर्धन होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना खासदार अमर काळे यांनी शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीवरही स्पष्ट भूमिका मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ वर्षांपूर्वी शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आजही शेतकऱ्यांना त्याचा अपेक्षित लाभ मिळालेला नाही, अशी टीका त्यांनी केली.
शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा त्यांच्या शेतमालाला योग्य आणि हमीभाव मिळावा, हीच खरी मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शंकरपट हा शेतकऱ्यांचा पारंपरिक खेळ असल्याने इतर खेळांप्रमाणेच शंकरपटालाही शासनाचा राजाश्रय मिळावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
या शंकरपट स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे थेट अमेरिका येथून आलेले पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी या पारंपरिक खेळाचे आणि उत्कृष्ट आयोजनाचे मनापासून कौतुक केले.
जळकापट येथील शंकरपट स्पर्धेमुळे संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.



