एक्स्प्रेसमधून पडला, अंगावरून ट्रेन गेली पण बचावला; दादर स्टेशनवर आमदार सतेज पाटील मदतीला

महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात नेत्यांचे दौरे सुरू आहेत. अशातच मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर घडलेल्या एका हादरवणाऱ्या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे या घटनेत एका आमदाराने दाखवलेली माणुसकी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
दादर स्टेशनवर नेमकं काय घडलं?
फेसबुकवरील ‘मराठा’ नावाच्या पेजवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टनुसार, दादर-अमरावती एक्स्प्रेसने प्रवास करत असताना एका युवकाचा अचानक तोल गेला. तो थेट प्लॅटफॉर्मवरून रेल्वे रुळावर पडला. काही क्षणांतच संपूर्ण एक्स्प्रेस ट्रेन त्याच्या अंगावरून गेली. उपस्थित प्रवाशांचे श्वास रोखले गेले आणि युवकाचा जीव वाचण्याची शक्यता संपल्याचे चित्र निर्माण झाले होते.
मात्र, दैव बलवत्तर ठरले. युवक एका जागी स्थिर राहिल्यामुळे तो चमत्कारिकरीत्या मोठ्या अपघातातून बचावला.
आमदार सतेज पाटील मदतीला धावले
या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूरकडे जाण्यासाठी महालक्ष्मी एक्स्प्रेसची वाट पाहत असलेले आमदार सतेज पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्वतः पुढे येत त्या युवकाला हात देऊन सुरक्षितपणे प्लॅटफॉर्मवर वर ओढले.
यावेळी त्यांनी युवकाची विचारपूस केली, दुखापत झाली आहे का याची चौकशी केली आणि त्याला धीर दिला. काही क्षणांत घडलेली ही घटना माणुसकी, धैर्य आणि प्रसंगावधानाचे उदाहरण ठरली.
फोटो सोशल मीडियावर व्हायरल
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये संबंधित युवक प्लॅटफॉर्मवर बसून भावूक झालेला दिसत आहे. तर आमदार सतेज पाटील त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला आधार देताना दिसतात. फोटोतील प्लॅटफॉर्म इंडिकेटरवरून ही घटना मुंबईतीलच असल्याचे स्पष्ट होत आहे.
नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव
या पोस्टखाली अनेकांनी आमदार सतेज पाटील यांचे कौतुक केले आहे. “लोकांच्या मदतीला तत्काळ धावून जाणारे नेतृत्व” अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. मात्र, या घटनेबाबत आमदार सतेज पाटील यांनी स्वतः कोणतीही अधिकृत पोस्ट किंवा माहिती शेअर केलेली नाही.
घटनेची अधिकृत पुष्टी नाही
ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून हजारोंच्या संख्येने लाईक्स मिळाले आहेत. मात्र, ही घटना नेमकी कोणत्या दिवशी घडली याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. तसेच, या घटनेची अधिकृत पुष्टी झी 24 तास करत नाही.



