महापारेषण–महानिर्मितीमध्ये ७६५ के.व्ही. पारेषण प्रकल्पासाठी सामंजस्य करार राज्यातील वीज वहन व्यवस्था अधिक बळकट होणार

महाराष्ट्रातील वीज वहन यंत्रणा अधिक सक्षम आणि स्थिर करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) आणि महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी (महानिर्मिती) यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. ७६५ के.व्ही. क्षमतेच्या पारेषण प्रकल्पासाठी ‘टॅरिफ बेस्ड कॉम्पिटिटिव्ह बिडिंग’ (TBCB) पद्धतीअंतर्गत संयुक्तपणे निविदा सादर करण्याचा निर्णय या कराराअंतर्गत घेण्यात आला आहे.
महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार आणि महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सामंजस्य करार पार पडला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
यावेळी महापारेषणचे संचालक (संचलन) सतीश चव्हाण, संचालक (प्रकल्प) अविनाश निंबाळकर, संचालक (वित्त) श्रीमती तृप्ती मुधोळकर, मुख्य विधी सल्लागार विजय पाटील, मुख्य अभियंता (TBCB) अमित नाईक तसेच महानिर्मितीचे संचालक (वित्त) मनेश वाघिरकर, संचालक (प्रकल्प) अभय हरणे, मुख्य विधी सल्लागार डॉ. कीर्ती कुलकर्णी यांच्यासह दोन्ही कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
संयुक्त क्षमतेचा लाभ
या करारामुळे महापारेषणचा पारेषण क्षेत्रातील दीर्घ अनुभव आणि महानिर्मितीची मोठ्या वीज प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील तांत्रिक कौशल्य एकत्र येणार आहे. ७६५ के.व्ही. श्रेणीतील पारेषण प्रकल्पांसाठी दोन प्रमुख शासकीय ऊर्जा कंपन्यांचे सहकार्य हे राज्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.



