युवा स्वाभिमान पार्टीत महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार मुलाखतींना सुरुवातपहिल्या दिवशी १२३ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीराजापेठ कार्यालयात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, कोअर कमेटीकडून अंतिम निर्णय

अमरावती, दि. 18 :
येथील राजापेठ परिसरातील युवा स्वाभिमान पार्टीच्या मुख्य कार्यालयात येत्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निवड प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली. या प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी तब्बल १२३ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती निवडणूक मुलाखत समितीकडून घेण्यात आल्या.
मुलाखतीदरम्यान इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. उमेदवारांचा सामाजिक कार्याचा अनुभव, पक्षनिष्ठा, जनसंपर्क, स्थानिक प्रश्नांची जाण तसेच निवडणूक जिंकण्याची क्षमता या विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने ही निवड प्रक्रिया पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने राबविण्यात येत असल्याचे पक्ष नेतृत्वाने स्पष्ट केले.
या मुलाखती राष्ट्रीय अध्यक्ष निळकंठराव कात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. यावेळी मार्गदर्शक म्हणून सुनीलजी राणा उपस्थित होते. निवडणूक मुलाखत समितीमध्ये प्रा. अजयजी गाडे, नंदेशजी अंबाडकर, शैलेंद्रजी कस्तुरे, जयंतराव वानखडे, हरिषजी चरपे, कमलकिशोरजी मालानी, शिवदासजी घुले, संजय हिंगासपुरे, सोनाली नवले, ज्योती सैरिसे, संजय मुनोत, मनोज चांदवानी, प्रा. सतीश खोडे, प्रा. संतोष बनसोड, गंगाधर आवारे आणि बाळु इंगोले यांचा समावेश होता.
पक्षाच्या ध्येयधोरणांशी प्रामाणिक राहून सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या उमेदवारांना संधी देण्याचा मानस पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे. येत्या काही दिवसांत उर्वरित इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार असून, त्यानंतर कोअर कमेटीकडून अंतिम निर्णय घेऊन अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.



