दिल्ली बमस्फोटानंतर अकोल्यातील 18 वर्षीय युवकाची पोलिस चौकशी; कोणताही संशय निष्पन्न नाही

अकोला : दिल्लीमध्ये झालेल्या बमस्फोटाच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील एका 18 वर्षीय युवकाला बार्शीटाकली तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. कुटुंबाने त्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केलेली होती.
स्फोट झाल्याच दिवशी युवक दिल्लीमध्ये असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाल्यानंतर अकोला पोलिसांनी गुप्तपणे त्याच्यावर लक्ष ठेवले आणि चौकशीसाठी ताब्यात घेतले. जवळपास 8 ते 10 तासांच्या चौकशीत युवकाकडून कोणतीही संशयास्पद किंवा धक्कादायक माहिती समोर आलेली नाही, त्यामुळे त्याला नंतर सोडण्यात आले.
अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्पष्ट केले की, युवकाचे कोणत्याही दहशतवादी गटाशी संबंध किंवा संशय आढळून आलेला नाही.
तरीही, खबरदारी म्हणून स्थानिक पोलिस आणि ATS युवकाचा कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), लोकेशन आणि इतर तांत्रिक तपास सुरू ठेवत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, युवक काही दिवसांपासून संशयास्पद हालचाली करत असल्यामुळे पोलिस आधीच त्याच्याकडे लक्ष ठेवून होते, मात्र आतापर्यंत तपासात कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत.
या घटनेनंतर अकोला जिल्ह्यात सुरक्षा पातळी वाढवण्यात आली असून, तपास सुरू आहे.



