चांदूर रेल्वेत नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार; चुरशीची निवडणूक रंगण्याची चिन्हे

चांदूर रेल्वे : नगर परिषद निवडणुकीत चांदूर रेल्वे शहरात राजकीय तापमान चांगलेच वाढले असून नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत अपेक्षित आहे. भाजप, काँग्रेस, आप, स्थानिक पॅनेल्स आणि अपक्ष अशा विविध स्तरांवरून उमेदवार मैदानात उतरल्याने शहरातील निवडणूक रंगतदार बनली आहे. कोण बाजी मारणार, याची उत्सुकता नागरिकांमध्ये शिगेला पोहोचली आहे.
नगराध्यक्षपदासाठी एकूण पाच उमेदवार रिंगणात असून त्यापैकी प्रत्येक जण विविध मुद्द्यांवर जोरदार प्रचार करत आहे.
भाजपकडून स्वाती मेटे या उमेदवार असून पक्षाच्या संघटनबळाच्या आधारावर त्यांनी प्रचाराला वेग दिला आहे.
काँग्रेसकडून पुनम सूर्यवंशी या महिला उमेदवाराची निवड करत काँग्रेसने नव्या नेतृत्वाला प्रोत्साहन दिले आहे.
आप (Aam Aadmi Party) कडून नम्रता गवली या स्थानिक प्रश्नांवर उपाययोजना आणि पारदर्शक कारभाराचे आश्वासन देत मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.
याशिवाय, प्रियंका विश्वकर्मा या चांदूर पॅनेलच्या उमेदवार असून त्यांना शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या तीन महत्त्वाच्या गटांचे समर्थन मिळाले आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी अधिक बलवान ठरली आहे.
अपक्ष म्हणून पूजा हर्षल वाघ या स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरल्या असून स्वतंत्र आवाज म्हणून जनतेचा पाठिंबा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
महिला नेतृत्वाची मजबूत उपस्थिती, स्थानिक प्रश्नांची उकल, पक्षीय समीकरणे आणि पॅनेल्समधील टक्कर… अशा विविध घटकांमुळे चांदूर रेल्वेची निवडणूक अधिकच रोचक झाली आहे. नगराध्यक्षपदाचा धुरा कोणाच्या हाती जाणार, हे आगामी निकालातून स्पष्ट होणार आहे.



