अंजनगाव सुर्जी नगर परिषद निवडणूक : अध्यक्षपदासाठी 4 प्रमुख उमेदवार, सदस्यपदासाठी तब्बल 257 अर्ज

अंजनगाव सुर्जी : नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची तयारी वेगात सुरू असून, शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अध्यक्षपदासाठी चार प्रमुख उमेदवारांनी मैदानात उडी घेतली असून, २८ वार्डांसाठी तब्बल २५७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मोठ्या प्रमाणातील अर्जांमुळे चुरस वाढली असून मतदारांमध्ये उत्सुकता सर्वोच्च बिंदूवर पोहोचली आहे.
अध्यक्षपदासाठी बहुपक्षीय लढत
अध्यक्षपदासाठी विविध पक्षांनी अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.
- भाजप : अविनाश गायगोले
- काँग्रेस : आयशा बानो रशीद खान
- AIMIM : विनीत डोंगरदीवे
- शिवसेना (शिंदे गट) : डॉ. स्पृहा डकरे
यासोबतच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडून एश गजानन लवटे यांनीही अर्ज दाखल केल्याने अध्यक्षपदाची लढत अधिक रंगतदार बनली आहे.
सदस्यपदासाठी २५७ उमेदवार रिंगणात
नगरपरिषदेत एकूण २८ वार्ड आहेत. या सर्व वार्डांसाठी आतापर्यंत २५७ उमेदवारांनी सदस्यपदासाठी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. उमेदवारीसाठी झालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे प्रत्येक पक्ष आणि पॅनेलने जनसंपर्क मोहीम वेगात सुरू केली आहे.
सत्तापरिवर्तन कोणाच्या बाजूने?
निवडणूक चुरशीची होत असून, सत्ता कोणाकडे झुकणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. उमेदवारांची धावपळ, प्रचाराची रणनीती आणि पक्षांची जोरदार मोहीम यामुळे अंजनगाव सुर्जी नगर परिषद निवडणूक अधिकच रोमांचक बनली आहे.



