Amaravti GraminEducation NewsLatest News

गो. से. महाविद्यालयात भाऊसाहेब बोबडे स्मृती सप्ताहानिमित्त भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन उत्साहात संपन्न…

खामगाव नगरीचे भाग्यविधाते, लोकनेते तथा माजी खासदार व विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय भाऊसाहेब बोबडे यांच्या स्मृती सप्ताहानिमित्त गो. से. महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले. या स्पर्धांचा उद्देश विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविणे तसेच स्व. भाऊसाहेब बोबडे यांच्या समाजसेवेच्या व विद्यार्थ्यांविषयीच्या कार्याला अभिवादन करणे हा होता. या प्रसंगी मान्यवरांनी स्व. भाऊसाहेब बोबडे प्रतिमेची पूजन केले तसेच त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण कार्याचा उल्लेख करून, त्यांनी शिक्षण आणि समाजकारणाच्या माध्यमातून केलेले योगदान स्मरणात ठेवणे हीच खरी श्रद्धांजली असल्याचे सांगितले. क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांची बहुआयामी प्रगती साधणे हा त्यांचा कायमच प्रयत्न होता, हेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. या क्रीडा स्पर्धांमध्ये बॅडमिंटन, रस्सीखेच, बुद्धिबळ, जलतरण व क्रिकेट यांचा समावेश होता. विशेष म्हणजे या स्पर्धेत विद्यार्थ्यांसोबतच महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीदेखील उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. बॅडमिंटन स्पर्धेत विद्यार्थ्यांमध्ये सईद सेफ सईद मुजीब यांनी विजेतेपद पटकावले तर पवन गोकुळ सोळंके उपविजेते ठरले. विद्यार्थिनी गटात पल्लवी चोपडे हिने प्रथम क्रमांक मिळवला तर गायत्री देवकर ही उपविजेती ठरली. प्राध्यापक गटामध्ये डॉ. देवेंद्र व्यास विजयी ठरले तर डॉ. संजय वराडे उपविजेते ठरले. जलतरण स्पर्धेमध्ये नवनीत भोसले हा विद्यार्थी विजयी झाला तर सुरज राठोड हा उपविजेता ठरला व बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विद्यार्थी गटामध्ये प्रसाद गवई विजयीव बळीराम डाबेराव हा उपविजेयी ठरला तसेच विद्यार्थिनी गटामध्ये साक्षी खवणे विजय तर आदिती शेलोकार उपविजेयी ठरली. रस्सीखेच स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या संघांनी दमदार खेळी करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाचे उद्घाटन विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष माननीय प्रकाशजी तांबट, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ सदस्य रोशनजी जैन व सदस्य विजयजी निलंगे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रफुलजी उबाळे, स्मृती सप्ताहाचे समन्वयक डॉ. डी. एन. व्यास, प्रा. डॉ. एम. ओ. वानखेडे, प्रा. डॉ. संजय वराडे, प्रा. डॉ. एच. ए. भोसले, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. अनुराग बोबडे, प्रा. अमित शिंदे, प्रा. राजकुमार फाटे, प्रा. डॉ. भरत जवंजाळ, प्रा. डॉ. नीता बोचे, प्रा. कोमल काळे व प्रा. धर्मराज मोगल आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, क्रीडा ही केवळ मनोरंजन किंवा शारीरिक व्यायामाचे साधन नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी ती अत्यावश्यक आहे. स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, शिस्त, आरोग्यदृष्टी, आत्मविश्वास तसेच नेतृत्वगुण विकसित होतात आणि यामुळेच ते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी ठरतात. स्मृती सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या क्रीडा स्पर्धांमुळे महाविद्यालयीन परिसरात उत्साहाचे वातावरण पसरले होते. विद्यार्थ्यांनी क्रीडा संस्कार आत्मसात करून आपल्या भविष्यात अधिक प्रगती करावी, हीच खरी भाऊसाहेब बोबडे यांना आदरांजली असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धांना विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद लक्षणीय असून महाविद्यालयीन क्रीडा संस्कृतीला नवी दिशा मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button