गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान टँकरने दिले लोकांना धडक, 8 जणांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी

कर्नाटकमधील हासन जिल्ह्यातील मोसाळे होसळी गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान एका टँकरने लोकांना धडक दिल्याने 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. तर 10 हून अधिक जणांची स्थिति चिंताजनक आहे. काही वेळापूर्वी ही घटना घडली आहे.
हासन तालुक्यातील मोसाळे होसळी गावात धक्कादायक घटना घडली आहे. हासन-म्हैसूर राष्ट्रीय महामार्गवर हा अपघात झाला आहे. रस्त्याच्या एका बाजूला मिरवणूक होती. दुसऱ्या बाजूला वाहतूक सुरु होती. दुभाजक तोडून रस्त्याच्या एका बाजूने टँकर आला होता. हजारो लोकांच्या मिरवणुकीला एका टँकरने धडक दिली. माजी मंत्री एचडी रेवन्ना घटनास्थळी होते. कौन्सिल सदस्य सूरज रेवन्ना आणि खासदार श्रेयस पटेल उपस्थित होते. अपघातामुळं मिरवणुकीत गोंधळ उडाला आणि लोक जीव वाचवण्यासाठी धावाधाव करू लागले. घटनास्थळी असलेल्या पोलीसांनी लगेच जखमींना उपचारासाठी हलवण्याची व्यवस्था केली. मात्र, या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहेत. तर यामधील 10 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.



