अमरावती: सतीधाम मार्केटचा भाग कोसळला

अमरावती – अमरावती शहराच्या मध्यभागी, तबला गल्लीतील सतीधाम मार्केट… एक असं ठिकाण, जिथे दररोज शेकडो नागरिक खरेदीसाठी येतात. याच मार्केटच्या दर्शनी भागाचा एक मोठा भाग अचानक कोसळला. वेळ होती रात्री ११ वाजताची. हा भाग पडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने, रात्रीची वेळ असल्यामुळे मार्केट पूर्णपणे बंद होतं. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण, जर हे दिवसाच्या वेळी झालं असतं, तर व्यवसायाचं मोठं नुकसान झालं असतं आणि जीवितहानीही झाली असती, अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
ही इमारत १९७७ मध्ये बांधलेली आहे. तब्बल २०० दुकानं असलेल्या या मार्केटमध्ये, ज्या भागाची गॅलरी कोसळली, तिथे दुकानदारांनी मोठे फलक लावले होते. त्यामुळे गॅलरीवर ताण वाढला असावा, असं एक कारण सांगितलं जातंय. तर दुसरं कारण, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे इमारतीची अवस्था जीर्ण झाली असावी, असा अंदाजही व्यक्त केला जातोय. या घटनेमुळे आता शहरातील जुन्या आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महानगरपालिकेने यापूर्वी या इमारतीला नोटीस दिली होती का? याची तपासणी होणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी प्रभात चौकात एक इमारत कोसळून ४ मजुरांचा मृत्यू झाला होता, तेव्हा शहरातील धोकादायक इमारतींची तपासणी सुरू झाली होती, पण नंतर ती थंड बस्त्यात पडली. आता महानगरपालिकेने पुन्हा एकदा या घटनेतून बोध घेऊन, सर्व जुन्या आणि धोकादायक इमारतींची तातडीने पाहणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.



