महाराष्ट्राचा GST संकलनात २१% वाटा – प्रधान मुख्य आयुक्त के. आर. उदय भास्कर यांची माहिती

मुंबई : देशातील वस्तू व सेवा कर (GST) संकलनात महाराष्ट्राचा वाटा तब्बल २१ टक्के असून, हे प्रमाण सुमारे ₹७.५ लाख कोटीं इतके आहे, अशी माहिती सीजीएसटीचे प्रधान मुख्य आयुक्त के. आर. उदय भास्कर यांनी दिली.
वर्ल्ड ट्रेड सेंटर (WTC) आणि ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज (AIAI) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “GST 2.0 : विकसित भारताचा मार्ग” या विशेष सत्रात ते बोलत होते. या कार्यक्रमात राज्य कर विभागाचे आयुक्त आशीष शर्मा, WTC व AIAI अध्यक्ष विजय कलंत्री, TCN Global च्या अनिंदिता चॅटर्जी, करतज्ज्ञ रागिनी तुलसियन यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
करदात्यांमध्ये मोठी वाढ
2017 मध्ये GST लागू झाल्यापासून करदात्यांची संख्या ६६.५ लाखांवरून २०२५ मध्ये १.५३ कोटींवर पोहोचली आहे. याच काळात GST संकलनातही मोठी वाढ होऊन ते ₹२२.०८ लाख कोटींच्या उच्चांकावर गेले आहे, असे भास्कर यांनी नमूद केले.
त्यांनी GST व्यवस्थेतील सुधारणा तीन प्रमुख स्तंभांवर आधारित असल्याचे सांगितले –
संरचनात्मक सुधारणा
दरांचे तर्कसंगतीकरण
जीवनमान सुलभता
MSME क्षेत्रासाठी सकारात्मक परिणाम
राज्य कर विभागाचे आयुक्त आशीष शर्मा यांनी सांगितले की, GST दरांचे तर्कसंगतीकरण झाल्याने शुल्क रचना अधिक सुसंगत झाली असून, त्यामुळे MSME क्षेत्राला मोठा लाभ होणार आहे.
AIAI अध्यक्ष विजय कलंत्री यांनी MSME क्षेत्राचे जीडीपीतील ३०% योगदान आणि रोजगारात ६०% हिस्सा अधोरेखित करत, कर कपातीमुळे मागणी वाढेल व उद्योगक्षेत्र स्पर्धात्मक बनेल, असे स्पष्ट केले.
Anti-Profiteering आणि कर नियोजनाचे महत्त्व
TCN Global च्या अनिंदिता चॅटर्जी यांनी Anti-Profiteering यंत्रणा तातडीने लागू करण्याची गरज मांडली. तर, करतज्ज्ञ रागिनी तुलसियन यांनी उद्योगांना करसमाविष्ट करार व लेखापुस्तकांचे पुनर्संतुलन करण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमात वरिष्ठ कर अधिकारी, उद्योगपतींचा सहभाग
या सत्रात केंद्र व राज्यातील वरिष्ठ कर अधिकारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, कर सल्लागार, MSME उद्योजक आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाच्या शेवटी AIAI च्या वरिष्ठ संचालक संगीता जैन यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.



