रहाटगाव परिसरात अग्निशमन उपकेंद्रासाठी पाहणी – आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची उपस्थिती
अमरावती : अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी दिनांक ३० जुलै रोजी रहाटगाव परिसराला भेट देऊन तेथे प्रस्तावित अग्निशमन उपकेंद्रासाठी जागेची पाहणी केली. वाढत्या लोकवस्तीच्या पार्श्वभूमीवर आणि आपत्कालीन सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने रहाटगावमध्ये अग्निशमन उपकेंद्र उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. यासंदर्भात आयुक्त चांडक यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन आवश्यक बाबींचा आढावा घेतला.
त्यांच्यासोबत मनपाचे संबंधित विभागप्रमुख शहर अभियंता रविंद्र पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जाधव, पशुशल्य चिकीत्सक डॉ.सचिन बोंद्रे, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, भुषण पुसतकर, उपअभियंता आशिष अवसरे, अभियंता राजेश आगरकर, आनंद जोशी, अग्निशमन विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या उपकेंद्रामुळे परिसरातील आपत्कालीन परिस्थितींना अधिक जलद प्रतिसाद देणे शक्य होणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सांगितले की, “नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करता अग्निशमन सेवांचा विस्तार ही काळाची गरज आहे. रहाटगाव परिसरातील प्रस्तावित उपकेंद्र लवकरात लवकर सुरु करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.”
रहाटगाव येथील प्रस्तावित अग्निशमन उपकेंद्राच्या पाहणी दरम्यान आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, जागेची तांत्रिक चाचणी लवकर पूर्ण करावी. भू-वापर, रस्ते संपर्क, जल व वीजसंपत्ती या घटकांचा सविस्तर अभ्यास करून अंतिम अहवाल सादर करावा. उपकेंद्रासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा (जसे की गाड्यांसाठी शेड, पाण्याची टाकी, नियंत्रण कक्ष इ.) समावेश असलेला प्राथमिक आराखडा ८ दिवसांत तयार करून सादर करावा. परिसरातील नागरिकांना माहिती द्यावी. रहाटगाव परिसरातील रहिवाशांना या उपकेंद्रामुळे मिळणाऱ्या सुविधांची माहिती देऊन जनजागृती करावी. अग्निशमन दलाच्या वाहनांसाठी स्वतंत्र रस्ता असावा. आपत्कालीन सेवांसाठी सहज व वेगवान प्रवेश असावा यासाठी स्वतंत्र आणि रुंद रस्त्याची योजना करावी. कामात कोणतीही विलंब नको. अग्निशमन उपकेंद्राची उभारणी ही जीवनरक्षक बाब आहे. त्यामुळे कामामध्ये कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही. सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे.



